वार्षिक स्नेहसंमेलन

आपल्या नावाचा दबदबा भारतात व भारताबाहेरही निर्माण करणा-या ब्राह्मण उद्योजकांच्या प्रदीर्घ मुलाखती हे या संमेलनाचे उल्लेखनीय वैशिष्ट्य! या उद्योजकांशी लीलया संवाद साधण्याची मोठी जबाबदारी प्रसिद्ध मुलाखतकार श्री.सुधीर गाडगीळ यांनी पहिल्यापासूनच घेतली आहे. आत्तापर्यंतच्या स्नेहसंमेलनांमध्ये ज्या उद्योजकांच्या मुलाखती झाल्या त्यात अनेकानेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा समावेश होता. त्यांच्याबरोबरच प्रसिद्ध महिला उद्योजिकांच्याही यशोगाथा मित्रमंडळींसमोर उलगडल्या गेल्या. ‘PNG‘ व ‘चितळे बंधूं‘ सारख्या उद्योजक घराण्यांचा प्रवास जाणून घेता आला.
तसेच दरवर्षी पुण्यातील ६ ते ७ रिटेल व्यावसायिकांचाही सत्कार या संमेलनात केला जातो, जेणेकरुन त्यांच्या व्यवसायाची माहिती अनेकांपर्यंत पोहोचेल.

कै. दाजीकाका गाडगीळ, कै. रघुनाथ उर्फ भाऊसाहेब चितळे व कै. राजाभाऊ चितळे आदी प्रभृतींच्या लाभलेल्या आश्वासक मार्गदर्शनामुळे ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या संमेलनाची घोडदौड सुरु आहे. पहिल्या संमेलनापासून शिस्तीचे काटेकोर पालन केले जाईल यावर जास्त भर दिला गेला. तेंव्हापासूनची एक गोष्ट आजही कटाक्षाने पाळली जाते. दरवर्षीच्या संमेलनाच्या शेवटी पुढील वर्षीच्या संमेलनाची तारीख जाहीर करण्याची! तसेच २५ वर्ष पूर्ण होईपर्यंत या संमेलनासाठी स्थळ : मनोहर मंगल कार्यालय आणि वेळ संध्या.६ : ३० ते ९:००  यात कधीही बदल झालेला नाही. संमेलनाच्या अशा मोठ्या कार्याची धुरा कार्यालयाचे श्री.मनोहर मेहेंदळे व परिवार यांनी कायमच सांभाळली आहे.

भारी भरारी

मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाने २०१८ पासून ‘भारी भरारी’ ह्या प्रदर्शनाची सुरुवात केली. ब्राह्मण व्यावसायिकांना एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचता यावं, यासाठी हे राष्ट्रीय पातळीवरील भव्य प्रदर्शन भरवलं जातं.

“भारी भरारी” म्हणजे फन फूड शॉपिंग. इथे असतात फॅशन, रियल इस्टेट, ज्वेलरी, वधूवर सूचक, असे अनेक व्यावसायिकांचे स्टॉल्स, संपूर्ण महाराष्ट्रातील चवदार खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची स्वतंत्र खाद्यनगरी आणि आपल्या मनोरंजनासाठी खास कार्यक्रम.